वरणगाव प्रतिनिधी | वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवेल गावच्या कमानीजवळ अवैध मुरूम उत्खनन करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी धाड टाकून पकडला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता शासनाच्या गौण खनिजाची चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईत उघडकीस आले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ हजार रुपये किमतीचा ३ ब्रास अवैध मुरूम (२ हजार रुपये प्रमाणे) आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा बिना नंबरचा पिवळ्या व राखडी रंगाचा १० चाकी डंपर (क्र. MH 19 CX 6711) असा एकूण २० लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी डंपरचालक सतीश गोपाळ कोळी (वय २२ वर्षे, रा. ओझरखेडा, ता. भुसावळ) याला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. शासकीय तलाठी रेणुका पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर तुकाराम शिंदे (वरणगाव पोलीस ठाणे) हे करत आहेत.



