चोपडा प्रतिनिधी | अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी रात्री सुमारे १२ वाजता लासूर ते हातेड मार्गावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे आणि प्रशांत ताराचंद अथाणी (दोघेही रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख ७७ हजारांचा गांजा, ३ लाखांची हुंडाई सॅन्ट्रो कार, ९० हजारांची पल्सर मोटारसायकल तसेच ४१ हजार किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम २०(ब) व २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून अमली पदार्थांचा पुरवठा आणि त्यामागील नेटवर्कबाबत सखोल तपास सुरू आहे.



