जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरात आणि तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत पात्र नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत सुलभ आणि जलदगतीने पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरात जामनेर तालुक्यातील सुमारे 5 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांशी संबंधित दाखल्यांचे वितरण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. विविध गावांमधून आलेल्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घेतला.
या उपक्रमामुळे नागरिकांची कामे एकाच ठिकाणी मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासन आणि शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



