यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चुंचाळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज (दि. २९) भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी आणि श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
गुरु-शिष्य परंपरेचे जतन आणि अध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. चुंचाळे परिसरातून अध्यात्मिकतेचा संदेश देणाऱ्या समर्थ वासुदेव बाबा, रघुनाथ बाबा आणि सुकनाथ बाबा यांच्या समाधीस्थळांना गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाही यात्रोत्सव आणि महाप्रसादासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्त पहाटे ५ वाजता मूर्ती अभिषेक, ६ वाजता मारुती अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महाआरती, तर सायंकाळी ७ वाजता आरती होणार आहे. सकाळपासून आरतीच्या वेळा वगळता दिवसभर भजन, भारुडे आणि नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून, सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक आणि रात्री ८ वाजता दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात निवासाची व्यवस्था, सुशोभीकरण तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही रिक्षाचालकांकडून भाविकांना मंदिरापर्यंत मोफत वाहतूक सेवा दिली जाणार आहे. शिरपूर येथून पायी दिंडीचे आगमन झाले असून, नायगाव, किनगाव, दहिगाव, सौखेडा, गिरडगाव, वाघोदा, मनवेल, साकळी आदी भागांतील भाविक मोठ्या संख्येने चुंचाळेत दाखल होत आहेत.
उत्सवात सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा शिष्यगण परिवारातर्फे करण्यात आले आहे.



