चोपडा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सतत वाढणाऱ्या पावसामुळे गुळ मध्यम प्रकल्प धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने शुक्रवारी दुपारी ३ वाजता धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडण्यात आले.
सुरुवातीला २ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पुढील काही तासांत तो ३ ते ४ हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गुळ नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोरगावले बुद्रुक–गोरगावले खुर्द मार्गावरील वळण रस्ता खचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. देवळी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने चोपडा–अमळनेर मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आली आहे. गरताड–कुरवेल मार्ग तसेच मोहिदा परिसरातील पूल धोक्याच्या स्थितीत असल्याने तेथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील पडलेले झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
चोपडा शहरातील रत्नावती नदीला २००६ नंतर प्रथमच मोठा पूर आला असून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



