भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील शिवणी गावाजवळ जामदा डावा कालवा अचानक फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कालव्याचे पाणी मोठ्या वेगाने लगतच्या शेतांमध्ये तसेच काही ठिकाणी गावाकडे घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच जामदा डावा कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कालव्यातील पाणी त्वरित बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार किशोर पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण आणि संपूर्ण प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महसूल व पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत पंचनामे व नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



