चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरात प्रसिद्ध हार्पिक कंपनीच्या नावाने बनावट उत्पादने विकून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंगल पॉईंट परिसरातील एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकून बनावट हार्पिकचा मोठा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान २ हजार २२२ बनावट हार्पिक सॅशे तसेच ५०० एमएल क्षमतेच्या ३२ बनावट हार्पिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २६ हजार ७१० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासात आरोपी प्रसिद्ध कंपनीच्या नावाचा व ट्रेडमार्कचा गैरवापर करून डुप्लिकेट हार्पिकची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



