जळगाव | प्रतिनिधी
मन्यारखेडा येथील तलावात मासे दगावल्याच्या प्रकरणावरून परिसरातील १६ उद्योजकांना प्रशासनाकडून अन्यायकारक पद्धतीने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप संबंधित उद्योजकांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची निष्पक्ष व तज्ज्ञांमार्फत सखोल चौकशी करून कायमस्वरूपी न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मत्स्य उत्पादकाच्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने उद्योजकांसह शेकडो कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योजकांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार सर्व उद्योगांनी स्वखर्चाने ईटीपी उभारून प्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळले आहेत.
उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, मन्यारखेडा तलावात केवळ उद्योगांचेच नव्हे तर आसपासच्या गावांतील सांडपाणी तसेच शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे पाणीही मिसळते. त्यामुळे माशांच्या मृत्यूमागील खरे कारण वैज्ञानिक तपासणीतून समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १६ पैकी काही उद्योजकांनी कारखाने विकल्याचा, तर काही उद्योग कच्च्या मालाच्या टंचाईमुळे आधीच बंद असल्याचा दावा करण्यात आला. तरीही त्यांना या प्रकरणात ओढले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. वर्षभर उद्योग सुरू असताना मासे केवळ ठराविक काळातच का दगावतात, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
उद्योजकांनी मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशी, एकतर्फी कारवाई थांबविणे, खोट्या तक्रारींची चौकशी आणि शेकडो कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.



