पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, दुकाने तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या दोन्ही तालुक्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून बाधित शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप नेते अमोल शिंदे यांनी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, जनावरे आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय पाचोरा आणि भडगाव शहरातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले. परिणामी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाईचे वितरण करावे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना त्वरित मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



