जळगाव प्रतिनिधी | डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन जगात अधिक सतर्क राहावे आणि सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, या उद्देशाने साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात सायबर अवेअरनेस सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देत इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या विशेष सत्रात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, सोशल मीडियावरील फसवणूक, फिशिंग हल्ले, मजबूत पासवर्डचे महत्त्व, डेटा चोरी तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची उदाहरणे देत त्यांनी सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांना कशा प्रकारे जाळ्यात ओढतात, याची माहिती दिली.
सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे हॅकरच्या भूमिकेवर आधारित सादरीकरण. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना सायबर हल्ले कसे होतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, याची स्पष्ट कल्पना मिळाली. याशिवाय प्रश्नोत्तरे, संवाद आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. त्यामुळे संपूर्ण सत्र ज्ञानवर्धक आणि रंजक ठरले.
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड, बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने व सावधगिरीने वागावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले, तर आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सायबर जनजागृती सत्र यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा संकल्प व्यक्त केला.



