जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यात पुन्हा एकदा भरधाव अवजड वाहनाच्या बेफाम वेगाने निष्पाप जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात राहणारा २९ वर्षीय सोनू रामा बागले यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
साकेगाव येथून दिवसभराची मजुरी करून पिकअप वाहनाने घरी परतत असताना टोलनाका परिसरात भरधाव वेगाने आलेल्या टँकरने पिकअपला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेमुळे पिकअपमधील सोनू बागले रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मागून येणारा ट्राला त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच चिरडले गेले. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. सोनू बागले हे हातमजुरी आणि बांधकामावर बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार असून, कुटुंबाचा आधारवडच हिरावला गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
.



