जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात विविध भागांतील जुगार अड्ड्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असतानाही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी परिसरात एका ‘बाळू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून कथितरित्या जुगार अड्डा, सट्टा तसेच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरवस्तीतील या ठिकाणी दिवसभर संशयित व्यक्तींची वर्दळ सुरू असते. जुगार आणि सट्ट्याच्या व्यवहारांसह अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराबाबत संबंधित पोलीस यंत्रणेला वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. मात्र केवळ वरवरची किंवा औपचारिक कारवाई केली जाते, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याचेही बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, शहरातील इतर भागांमध्ये अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत असताना सुप्रीम कॉलनी परिसरातील कथित प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील या प्रकरणात आता जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घालून वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



