जळगाव प्रतिनिधी | शहरातील आयोध्या नगर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कुसुंबा येथील रहिवासी आयुष गजानन भोपळे (वय 15) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वीही त्याला मारहाण केली होती. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आयोध्या नगरातील श्रीराम मंदिर परिसर तसेच बी.यू.एन. रायसोनी शाळेजवळ आरोपी विद्यार्थ्याने आयुषवर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात आयुषच्या बरगडीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती लक्षपूर्वक तपासली जात आहे.
जखमी विद्यार्थ्याचे वडील गजानन प्रभाकर भोपळे यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, या घटनेमुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



