पारोळा प्रतिनिधी | पारोळा शहरातील न्हावी गल्ली येथील ४० वर्षीय इसमाचा बोरी नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुनिल अशोक चौधरी (आण्णा चौधरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल चौधरी हे ६ ऑगस्ट रोजी मालवाहू वाहन घेऊन मित्र नितीन गोकुळ पाटील (रा. बोदडे) यांच्यासोबत भिलाली गावाकडे गेले होते. भिलाली गावाजवळील बोरी नदीपात्रातील बंधाऱ्यात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दोघे पोहण्यासाठी गेले असता सुनिल चौधरी पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी सकाळी सुनिल चौधरी यांचा मृतदेह बोरी नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सकाळी सुमारे १० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती किशोर तुकाराम चौधरी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप सातपुते करीत आहेत.



