यावल प्रतिनिधी | जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल शहरात रविवारी आदिवासी समाजबांधवांचा उत्साह आणि एकजूट पाहायला मिळाली. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
तडवी कॉलनी परिसरातून दोन, मनुदेवी मंदिरापासून एक आणि पंचायत समितीच्या आवारातून एक अशा एकूण चार मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीपूर्वी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांच्यासह विविध आदिवासी थोर विभूतींच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
मनुदेवी मंदिरापासून आदिवासी टोकरे, ढोर, महादेव व मल्हार कोळी समाजबांधवांची मिरवणूक निघाली. तर तडवी कॉलनीतून आदिवासी तडवी भिल्ल उत्सव समिती, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच, आदिवासी सेवा मंडळ आसेम संघटना तसेच पंचायत समितीतून आदिवासी विकास परिषदेतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या.
मिरवणुकांमध्ये सजीव देखावे सादर करण्यात आल्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. आमदार अमोल जावळे, नगराध्यक्ष छायाताई पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह नगरसेवक, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.
शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत काही मिरवणुकांचा समारोप धनश्री मंगल कार्यालय, काहींचा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तर काहींचा सुमंगल कार्यालयात करण्यात आला. सहभागी समाजबांधवांसाठी महसूल विभाग व तडवी भिल्ल कर्मचारी संघटनेतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलिस व होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.



