जळगाव प्रतिनिधी | शहराला अधिक हिरवेगार, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता महापालिकेने आक्रमक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या संकल्पनेतून ‘मियावाकी’ पद्धतीच्या भव्य वृक्षारोपण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली.
जळगाव महानगरपालिका आणि ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम शहरातील विविध प्रभागांमध्ये राबवण्यात येत आहे. टी. एम. नगर परिसरात राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
‘मियावाकी’ पद्धतीमुळे कमी जागेत मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करून शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाढते प्रदूषण, उष्णता आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर मात करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी महापौर दीपमाला काळे, आमदार राजू मामा घोडे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, आयुक्त आदित्य जीवने, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



