यावल प्रतिनिधी |
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा हजारो किलोमीटर दूरपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभाग सज्ज झाला आहे. परदेशात असलेल्या भावाला बहिणीची राखी सुरक्षितपणे पाठविण्यासाठी भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्पीड पोस्टच्या माध्यमातून देशांतर्गत ५० ग्रॅमपर्यंत राखी केवळ ५५ रुपयांत, तर परदेशात २३६ रुपयांपासून राखी पाठविता येणार आहे. विशेष म्हणजे जगातील तब्बल १३७ देशांमध्ये साधारण ७ ते १२ दिवसांत राखी पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी आतून प्लास्टिक कोटिंग असलेले खास रक्षाबंधन पाकीटही पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे भाऊ परदेशात अथवा लांबच्या ठिकाणी असल्याने अनेक बहिणींना प्रत्यक्ष राखी बांधता येत नाही. अशावेळी पोस्टाच्या माध्यमातून बहिणीने प्रेमाने निवडलेली राखी भावापर्यंत पोहोचविण्याची सुविधा भावनिक नाते अधिक घट्ट करणारी ठरत आहे.
दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त भावाला पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी जीवन विमा किंवा पीपीएफ खाते उघडून देण्याचाही पर्याय पोस्ट विभागाने सुचविला आहे. डिजिटल युगात ही आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आणि भविष्यासाठी सुरक्षित भेट ठरू शकते.
“पोस्ट ऑफिस ही केवळ पत्रे आणि पार्सल पोहोचविणारी यंत्रणा नसून माणसामाणसांमधील नाती आणि भावना जोडण्याचे काम करते,” असे सांगत भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक मनीष नवलु यांनी केले आहे.



