रावेर प्रतिनिधी | जून महिन्यात १, ४ आणि ६ जून रोजी झालेल्या जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात आले; मात्र दोन महिने उलटूनही नुकसान भरपाईबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रावेर तहसील कार्यालयात निवेदन देत तातडीने नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी केली. तसेच पीक विम्याची मुदत संपूनही संबंधित महसूल मंडळे जाहीर करण्यात न आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पीक विमा कंपनीकडून ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांचे विमा क्षेत्र कमी दाखवण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दोन महिन्यांपासून शासनाकडून मदतीची प्रतीक्षा असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. आठवडाभरात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेऊन मदत जाहीर केली नाही, तर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सुनील कोंडे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निळकंठ चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी
“दोन महिने उलटूनही मदत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर दोन लाख रुपये जमा झाल्याचा दावा आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना मदत मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घ्यावी,” अशी मागणी निंभोरा येथील केळी उत्पादक शेतकरी सुनील कोंडे यांनी केली.



