जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर जळगाव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध गुन्हेगारीविरोधी कारवायांना गती मिळाली असून, पोलीस यंत्रणेच्या कामकाजातही प्रभावीपणा आणण्यावर भर देण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि गुणवत्तापूर्ण सेवेला राष्ट्रपती पदकाच्या माध्यमातून सन्मान मिळाला आहे. शिस्त, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड करण्यात आली.
एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांना राज्य आणि राष्ट्रपती स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने जळगाव पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे. उद्या, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या तिन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.



