रावेर : प्रतिनिधी
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि ध्येयावरचा विश्वास कायम ठेवला तर यश मिळते, हे रावेर शहरातील कांचन जयंत महाजन यांच्या यशाने सिद्ध केले आहे. शेतमजुरी करून मुलांना शिकविणाऱ्या विधवा आईच्या कष्टांना अखेर मुलीच्या यशाने सोनेरी किनार मिळाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI अर्थात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, कांचन महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातून २३ वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांच्या निवडीची माहिती मिळताच कुटुंबीय आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कांचन यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांचे १९ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या शिक्षणासाठी हेमलता यांनी शेतमजुरी करत परिस्थितीशी संघर्ष केला. उन्ह, पाऊस आणि आर्थिक अडचणींची पर्वा न करता त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत कांचन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्याने अभ्यास आणि मेहनत केल्यानंतर अखेर एमपीएससीच्या अंतिम निकालात २३ वा क्रमांक मिळवत त्यांनी आईच्या कष्टाचे चीज केले.
“आईने केलेल्या कष्टांमुळेच आज मी या यशापर्यंत पोहोचले,” अशी भावना कांचन महाजन यांनी व्यक्त केली. युवक-युवतींना संदेश देताना त्यांनी स्वप्नांवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. नैराश्याला बळी न पडता उपलब्ध संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
कांचन महाजन यांच्या यशामुळे रावेर शहरात त्यांच्या कुटुंबाचे कौतुक होत असून, आईच्या संघर्षाला आणि मुलीच्या जिद्दीला मिळालेला हा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे.



