जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यांवर टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंप्राळा परिसरातील विविध रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची टोळकी ठिकठिकाणी दिसून येत आहेत. अचानक कुत्रे अंगावर धावून येण्याची भीती असल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना कुत्र्यांची भीती वाटत असून, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत रस्त्यावर कुत्र्यांची संख्या अधिक जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे धावण्याचे प्रकारही घडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसराची पाहणी करावी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच शाळकरी मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.
आता महानगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येवर नेमकी काय कारवाई करते, याकडे पिंप्राळावासीयांचे लक्ष लागले आहे.



