पारोळा प्रतिनिधी | पारोळा शहरासह परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एकाच रात्री पेट्रोल पंप, क्रेन सर्व्हिस दुकान आणि हॉटेलला लक्ष्य करत रोख रकमेसह दोन दुचाकी लंपास केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुर्गा पेट्रोल पंपाच्या केबिनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांच्या बॅगमधून ३० ते ३२ हजारांची रोकड चोरली. त्यानंतर पंपाच्या मागे राहणारे भूषण चौधरी यांची ‘शाईन’ मोटरसायकल चोरून त्यांनी काढता पाय घेतला. पुढे ‘जय जनार्दन क्रेन सर्व्हिस’चे मालक रवींद्र पाटील झोपलेले असताना त्यांच्या खिशातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला; मात्र पाटील यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
यानंतर चोरट्यांनी म्हसवे शिवारातील ‘सहयोग हॉटेल’ आणि ‘पारख पेट्रोल पंप’ येथे चोरीचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला तरीही भामटे पसार होण्यात यशस्वी झाले. यानंतर चोरट्यांनी सावखेडा होळ येथून एका शेतकऱ्याची ‘स्प्लेंडर’ मोटरसायकलही लंपास केली.
पारख पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून, या फुटेजच्या आधारे पारोळा पोलीस अज्ञात भामट्यांचा वेगाने शोध घेत आहेत.



