यावल प्रतिनिधी | शहरातून सातोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुस्लिम कब्रस्तानाच्या कोपऱ्याजवळ गटारीत चिखलात एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रविवारी सायंकाळी ही घटना समोर आली. नागरिकांनी तत्काळ यावल पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, मैनोद्दीन सय्यद, सहायक फौजदार विजय पासपोळ, पोलीस हवालदार रोहील गणेश आणि अर्षद गवळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला गटारीतून बाहेर काढून उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अख्तर यांनी तपासणी केल्यानंतर सदर व्यक्तीला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, त्याच्याकडे ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आढळली नसल्याने त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्ती कोणत्या भागातील रहिवासी आहे, याचा तपास पोलीस करत असून, नागरिकांनी त्याची ओळख पटविण्यासाठी यावल पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



