चाळीसगाव : तालुक्यातील कुंझर येथील विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून केल्याप्रकरणी तिचा दीर प्रविण छगन बैरागी याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
ही धक्कादायक घटना २०१८ मध्ये कुंझर येथे घडली होती. संबंधित महिला आपल्या सासरी राहत होती. आरोपी प्रविण बैरागी हा तिचा दीर होता. घटनेच्या रात्री त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध केल्याने आरोपीने तिचा खून केल्याचे न्यायालयीन प्रकरणातून समोर आले.
घटनेनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. खुनानंतर मृत महिलेच्या गळ्यातील दोरी काढून ती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात आरोपीची आई लिलाबाई छगन बैरागी हिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही न्यायालयात सिद्ध झाले.
वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यानुसार आरोपी प्रविण बैरागीला जन्मठेप, तर लिलाबाई बैरागी यांना तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.



