यावल प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथे ३८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. छायाबाई ज्ञानेश्वर अहिरे असे मृत महिलेचे नाव आहे.
डांभुर्णी येथील पंडितनगर परिसरात ज्ञानेश्वर नंदू अहिरे हे पत्नी छायाबाई व कुटुंबीयांसह राहत होते. मंगळवारी सकाळी छायाबाई यांनी घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. छायाबाई यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी व किशोर परदेशी पुढील तपास करीत आहेत.



