जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट संघासाठी निवड प्रक्रिया जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरू झाली आहे. राज्याच्या विविध भागांतून निवडण्यात आलेल्या ४० युवा महिला क्रिकेटपटू या प्रक्रियेत सहभागी झाल्या असून, महाराष्ट्र संघात स्थान मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
निवड प्रक्रियेअंतर्गत १८ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एकूण सहा सराव सामने खेळविण्यात येत आहेत. या सामन्यांमधील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासोबत खेळाडूंचा फिटनेस, निर्णयक्षमता आणि संघभावना यांचेही बारकाईने मूल्यमापन केले जाणार आहे. या कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राच्या अंडर-१९ मुलींच्या टी-२० संघासाठी गुणवंत खेळाडूंची निवड होणार आहे.
सहा सराव सामने पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंचे ३० ऑगस्टपर्यंत जळगावात सराव शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरात खेळाडूंच्या कौशल्यविकासासह सामन्याची रणनीती आणि संघातील समन्वयावर विशेष भर दिला जाणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे. राज्यस्तरीय महिला क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया जळगावात होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



