यावल प्रतिनिधी | तालुक्यातील इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून आता पालकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तब्बल १२१ विद्यार्थी उर्दू माध्यमाचे असल्याने निकाल संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. परीक्षेत सामूहिक कॉपी झाली असावी, असा संशय व्यक्त करत साकळी येथील पालकांनी चौकशीची मागणी केली आहे.
यावल येथील गट साधन केंद्रात गटशिक्षण अधिकारी फिरोज पठाण यांना पालकांनी निवेदन दिले. निवेदनानुसार, तालुक्यातील १५२ शाळांमधून केवळ ११ शाळांतील १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १२१ विद्यार्थी उर्दू माध्यमाचे, तर केवळ ३ विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत.
विशेष म्हणजे मारूळ परिसरातील ४० आणि फैजपूर परिसरातील ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे पालकांनी निवेदनात नमूद केले आहे. या दोन्ही भागांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने परीक्षेच्या निकालाबाबत शंका निर्माण झाली असल्याचा दावा पालकांनी केला आहे.
संबंधित परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपी झाली असण्याची शक्यता तपासावी, तसेच संपूर्ण निकालाचे ऑडिट करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मात्र, सामूहिक कॉपी झाल्याचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नसून, पालकांच्या तक्रारीनंतर चौकशी झाल्यासच या निकालामागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



