जळगाव प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेत धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने संबंधित अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करत ते जमीनदोस्त केले.
शहरात उघड्यावर मांस विक्री तसेच नियमबाह्य आणि अवैध मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळल्यानंतर महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने तातडीने कारवाई केली.
शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान गोमांस साठवणूक व विक्रीसाठी वापरले जात असल्याचे सांगितले जाणारे अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान, शहरातील अवैध मांस विक्री आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.



