जळगाव प्रतिनिधी | जळगावात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने तब्बल ४ किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त केली आहे. या जप्त अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल १ कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मीरा-भाईंदर परिसरातील एनडीपीएस प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत जळगावात सुमारे पाच किलो एमडीचा साठा पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जळगावात कारवाई सुरू केली.
मेहरुण परिसरातील रामनगरातून एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे उस्मानिया पार्क परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही सहभागी झाले होते. जप्त केलेला ड्रग्जचा साठा जळगावात कुठे वितरित होणार होता, तसेच या अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



