नाशिक प्रतिनिधी | वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वरिष्ठ सहायकाला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. आरोपी लोकसेवक रामचंद्र नरसू माकरे, वरिष्ठ सहायक वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक याने तक्रारदाराच्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराकडून सुरुवातीला तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. आरोपीविरोधात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अमित विनायक खारकर यांनी आरोपीला दोषी ठरवले.न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड, तर कलम १३(२) अंतर्गत एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.



