जळगाव प्रतिनिधी | नाशिकला रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत.
ही धक्कादायक घटना ३१ ऑगस्ट रोजी असोदा ते ममुराबाददरम्यानच्या बायपासवर घडली. चारचाकी वाहनातून ईश्वर महाजन यांना उपचारासाठी नाशिकला नेण्यात येत होते. मात्र, बायपासचा एक मार्ग बंद असल्याने वाहन दुसऱ्या बाजूने जात असतानाच पाळधीकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शांताराम पाटील यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तालुका पोलिसांनी ट्रकचालक सतीश ढिल्लो याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.



