जळगाव | जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील धनश्री नगर येथील १०३ क्रमांकाच्या वादग्रस्त खुल्या भूखंडाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित भूखंडावर करण्यात आलेल्या बांधकामाबाबत यापूर्वी महापालिका प्रशासनाने पंचनामा केला होता. या पंचनाम्यात अतिक्रमण आढळल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. तसेच बांधकामासाठी आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला. यानंतर संबंधितांना महापालिकेकडून १५ दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हा भूखंड माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेशी संबंधित असल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. मात्र कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नियमांनुसार पारदर्शक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. पियूष पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून करण्यात आलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. येत्या तीन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ‘मुक्काम पोस्ट’ ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



