पारोळा प्रतिनिधी | पारोळा शहरात नगरपालिकेजवळून उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुनील अशोक पाटील यांची मोटरसायकल चोरीला गेली असून, या घटनेमुळे परिसरात वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेजवळ दुचाकी उभी असताना दोन चोरटे तेथे आले. दोघांनी काही वेळ दुचाकीजवळ थांबून आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवली. परिसरात कोणी नसल्याची खात्री होताच त्यांनी संधी साधून दुचाकी चोरून नेली. चोरीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.



