रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील लालमाती येथे अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून पुन्हा वाद उफाळून आल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हाणामारीत सजाब मोहिते आणि बलराम मोहिते हे दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी हरदेव मोहिते यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात सुनील जाधव, अजय जाधव, राहुल जाधव आणि शांताराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून झालेल्या या मारामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.



