जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपानंतर तणाव निर्माण झाला आहे. खासगी शिकवणी घेणाऱ्या एका व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे
घटनेची माहिती समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्ये आक्रोश निर्माण झाला. त्यानंतर काही नागरिकांनी जामठी गावात जाऊन संशयिताच्या घरासह काही वाहनांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी जाळपोळीचीही घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर बोदवड आणि जामठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.



