सागर पार्कमध्ये १५० फुटांवरील दहीहंडीचा थरार; श्रीकृष्ण गोविंद पथकाने आठ थर रचत फोडली हंडी!
जळगाव प्रतिनिधी | जळगावच्या सागर पार्क मैदानावर एल. के. फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात थराराचा कळस पाहायला मिळाला. तब्बल १५० फूट उंचीवर लावण्यात आलेली दहीहंडी फोडण्याचा मान श्रीकृष्ण गोविंद पथकाने मिळवला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जळगाव शहरातील माजी महापौर तथा एलके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ललित कोल्हे, सरिता ताई कोल्हे, महापौर दीपमाला काळे, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गजर करण्यात आला. त्यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी एकामागून एक असे तब्बल आठ थर रचत श्रीकृष्ण गोविंद पथकाने राजेशाही थाटात साजऱ्या झालेल्या या मराठमोळ्या दहीहंडीला गवसणी घातली. गोविंदांच्या जयघोषाने आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सागर पार्क मैदान दुमदुमून गेले.
दहीहंडी फोडताच श्रीकृष्ण गोविंद पथकाच्या विजयी जल्लोषाला उधाण आले. या दणदणीत कामगिरीसाठी पथकाने तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.
दरम्यान, दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी सागर पार्क मैदानावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेले मैदान, ढोल-ताशांचा गजर आणि तरुणाईचा उत्साह यामुळे वातावरण अक्षरशः जल्लोषमय झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात, गोविंदांच्या जयघोषात आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने सागर पार्कवर रंगला दहीहंडीचा हा थरार!



