भुसावळ प्रतिनिधी | शहरातील पाटील मळा परिसरात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाई करत एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणाची ओळख तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. भुसावळ, जि. जळगाव) अशी झाली आहे. तुषार सोनवणे हे भुसावळ रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तुषार सोनवणे यांचे संशयिताच्या आईसोबत वारंवार बोलणे होत असल्याने संशयिताच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्या दोघांमधील जवळिकीबाबत संशय असल्याने या रागातून खुनाचा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वतंत्रपणे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले.
मात्र, खुनाचे नेमके कारण काय होते, हल्ला कोणत्या परिस्थितीत झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
अल्पवयीन संशयित असल्याने त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.



