जळगाव प्रतिनिधी | दीड महिन्याच्या खंडानंतर अखेर जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. जळगाव शहरासह भुसावळ, जामनेर, यावल, एरंडोल, कडोली, आडगाव, कासोदा आणि विसरखेडा परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. जळगाव शहरात संध्याकाळी सुमारे सात वाजेपासून जवळपास दीड तास पावसाची जोरदार सर कोसळली. त्यानंतरही पावसाची शक्यता कायम आहे.
दरम्यान, जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जळगाव-शेळगाव मार्गावर बोऱ्हावळ गावाजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
भुसावळमध्येही दुपारी सुमारे तीन वाजता दमदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला. मुसळधार सरींनंतर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली.
जामनेरमध्ये सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील बारागाड्या ओढ्याला पूर आला. ओढ्याला पूर आल्याने भक्तांनी त्याठिकाणी जल्लोष केला.
दीड महिन्यानंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी पिकांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी समाधानकारक पावसाची गरज असल्याचे चित्र आहे.



