जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात रात्रीच्या सुमारास रेनॉल कंपनीची चारचाकी गाडी नाल्यात सरकून अडकली. गणपती हॉस्पिटल ते प्रभात चौकादरम्यान सर्व्हिस रोडचे काम सुरू असताना रस्त्यालगत असलेल्या नाल्यात ही कार अडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नाल्यात अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
अग्निशमन वाहनावरील रोप विंचच्या सहाय्याने कारला टो करून नाल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. जवानांनी कौशल्याने आणि काळजीपूर्वक बचावकार्य करत काही वेळातच कार सुरक्षितपणे नाल्यातून बाहेर काढली.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे वाहनचालक देविदास सुरवाडे, तसेच फायरमन रोहिदास चौधरी, ऋषभ सुरवाडे आणि ऋषिकेश वाघ यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे नाल्यात अडकलेले वाहन सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सर्व्हिस रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने वाहनधारकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला असून कारही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.



