जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वाढता अमली पदार्थांचा प्रभाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत पोलीस पाटलांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे आयोजित पोलीस पाटील मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात पोलीस पाटलांसाठी विविध कार्यशाळा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. पोलीस पाटलांचे अधिकार, कर्तव्ये तसेच बदलत्या परिस्थितीत त्यांच्यासमोरील आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असून, बदलत्या परिस्थितीत त्यांची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात ड्रग्सविरोधात बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांनीही कारवाई केली आहे. या प्रकरणाचे कनेक्शन प्रयागराजपर्यंत असल्याचे समोर आले असून, हे आव्हान केवळ जळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित नसून देशासमोरील गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तेरा वर्षांच्या मुलांपासून तरुणांपर्यंत ड्रग्स, गांजा, दारू आणि इतर नशेच्या पदार्थांचा वाढता प्रभाव चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव पोलिसांनी अवैध दारूच्या भट्ट्यांवर तसेच एमडी ड्रग्स आणि गांजाविरोधात चांगली कारवाई केली आहे. संशयित आरोपींवर एमपीडीएअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचे काम शंभर टक्के परिपूर्ण नसले तरी त्यांनी अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनावट खवा जप्त करण्याच्या कारवाईवरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात झालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सप्टेंबरअखेरपर्यंत सुरू करावी, अशी शासनाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबारमधील महायुतीच्या आमदारांच्या नाराजीबाबतही अंतर्गत प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवू, असे त्यांनी स्पष्ट केले.



