जळगाव प्रतिनिधी | पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या मोठ्या खवा आणि पनीर कारवाईचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. FDA चे अधिकारी मुंढे हे अतिशय चांगले काम करत असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आपणही त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा आणि पनीर पकडले जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला मोकळीक दिली असून, या खात्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या आंदोलनाबाबतही महाजन यांनी सरकारची भूमिका मांडली. जरांगे पाटील यांना वेळोवेळी सरकारचे शिष्टमंडळ भेटले असून, त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या घटनात्मक किंवा कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित मागण्या कशा मान्य करायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येक वेळी नवीन मागणी करणे आणि आंदोलनादरम्यान मंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नसल्याचेही महाजन म्हणाले. प्रश्नांचा तोडगा सनदशीर मार्गानेच निघू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचनांनुसार सरकार त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. वारंवार उपोषण केल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याने त्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
MPSC पेपरफुटी प्रकरणावर बोलताना सरकार कुठेही अपयशी नसल्याचा दावा महाजन यांनी केला. काही व्यक्तींनी पैशाच्या हव्यासापोटी पेपरफुटीसारखा नालायकपणा केल्याचे ते म्हणाले. पेपर अनेक व्यक्तींच्या हातातून जात असल्याने त्यातील एखाद्यामुळे गैरप्रकार होऊ शकतो; मात्र भविष्यात पेपरफुटी होऊ नये यासाठी सरकार अत्यंत सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत; मात्र त्यांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप होऊ नये. विद्यार्थ्यांनी राजकीय मंडळींना दूर ठेवावे, असे आवाहनही महाजन यांनी केले. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून, भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



