जळगाव प्रतिनिधी | ऐन गणेशोत्सवाच्या काळात जळगाव शहरातील खड्डे, बंद पथदिवे, अनियमित पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक आक्रमक झाले. सण संपल्यानंतर आणि नागरिकांचा जीव गेल्यानंतरच रस्ते व पथदिवे दुरुस्त करणार का? असा थेट सवाल करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले.
बंद पथदिव्यांच्या प्रश्नावर नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘लोक मेल्यावर एजन्सी येणार का? गणपती गेल्यावर लाईट लावणार का? लोकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतोय,’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर विद्युत विभागप्रमुख संदीप मोरे यांनी अटी-शर्तींच्या प्रक्रियेमुळे एजन्सीसोबतचा करार करण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले. लवकरच करार पूर्ण करून पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरही सभेत जोरदार चर्चा झाली. वर्क ऑर्डर देऊन महिना उलटला, तरी खड्डे बुजवले का गेले नाहीत? असा जाब स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे आणि नवसाचा गणपती मंदिर परिसरातील खराब रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. अनियमित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरही नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली.
सभेत विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले. अखेर गदारोळाच्या वातावरणात विषयपत्रिकेवरील आठ विषयांना मंजुरी देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पथदिवे आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.



