जामनेर प्रतिनिधी | जामनेरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २ लाख ९४ हजार ३६० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईदरम्यान संशयित आरोपी पोलिसांच्या चाहुलीने अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
१४ सप्टेंबर रोजी जामनेर-भुसावळ रोडवरील शिंगाईत शिवारात, सुशिला एजन्सीजवळील रामा हॉटेल परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने परिसरात सापळा रचला होता. यावेळी भगवान हिरामन सुशीर, रा. शिंगाईत याच्या ताब्यात हिरवट-तपकिरी रंगाची पाने, फुले आणि बिया असलेला गांजा आढळून आला.
पोलिसांची चाहूल लागताच भगवान सुशीर याने घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. हा गांजा नशेखोरांना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांच्यासह पथकाने कारवाई केली. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.
यांनी केली कारवाई
पो.हे.कॉ. उमेश चौधरी, पो. कॉ. सचिन महाजन, पो. कॉ. योगेश पाटील, पो. कॉ. विशाल लाड, पो. कॉ. अमोल पाटील यांनी ही कारवाई केली.



