पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा विरोधात महसूल प्रशासनाने शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी पहाटे पासून धडक कारवाईला सुरुवात केली. कुरंगी, परधाडे, दुसखेडा, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा, दहिगाव संत परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. वारंवार होणाऱ्या तक्रारीकडे प्रशासनाने लक्ष वेधून ही धडक कारवाई केली.
या कारवाईसाठी पाचोरा प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल तसेच पाचोरा व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहने जप्त केली.
या १०० अधिकारी, कर्मचारी मोठ्या फौजफाट्यासह १८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली. गिरणा नदीच्या कथित अवैध वाळूउपसा सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. या अवैध उत्खननामुळे नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेत बदल होत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कारवायांची परिणामकारकता आणि अवैध वाळूउपशाला आळा घालण्यात आलेले अपयश याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली असताना. अचानक आलेल्या धाडसी अधिकाऱ्यांना पाहून वाळू माफियांची भांबेरी उडाली.
या धडक कारवाईत १ जे.सी.बी., ८ डंपर, १६ ट्रॅक्टर २ गिरणा नदीच्या पात्रातून पाण्यामधून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या किनी या वाहनांची जप्ती करून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जागेवर पंचनामे करुन जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर एम. आय. डी. सी. गोडावुन याठिकाणी लावण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची महसूल, पोलिस आणि आरटीओ विभागाने संयुक्तपणे कारवाई करून दोषींवर कायदेशीर बडगा उगारावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या कारवाईत ८० ब्रास अवैध वाळू च्या ढीगाचा पंचनामा करण्यात आला. संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गिरणा नदीपात्रातील अवैध उत्खननावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवून नदीचे पर्यावरणीय संरक्षण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या गिरणा पट्यात महसूल सजाला महिला मंडळ अधिकारी सह ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याने.
अवैध वाळू उपसा मागील काही वर्षांपासून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत जोरात वाहतूक सुरू झाली होती. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी उत्तम जाधव, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा, मोटार निरीक्षक अभिजित खरे, नांद्रा मंडळ अधिकारी वैशाली पाटील, नगरदेवळा मंडळ अधिकारी राहुल पवार, कुऱ्हाड मंडळाधिकारी भरत नन्नवरे, पाचोरा मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्या सह भडगाव येथील १५ ग्राम महसूल अधिकारी पाचोरा महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या सह कोतवाल पोलिस पाटील उपस्थितीत ही आतापर्यंतची मोठी कारवाई केली. या कारवाई ने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.



