जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरालगत असलेल्या खेडी गावाजवळ धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तीन ते चार जणांनी ४५ वर्षीय किशोर मधुकर बाविस्कर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बाविस्कर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
किशोर मधुकर बाविस्कर हे खेडी येथील शिवनगर परिसरात वास्तव्यास असून, भंगार विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संशयित आनंद पाटील, गौरव पाटील, सनी (पूर्ण नाव समजू शकलेले नाही) आणि अन्य एका व्यक्तीने बाविस्कर यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून रात्री उशिरा बाविस्कर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा संशयितांनी बाविस्कर यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र, यावेळीही त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने वादाला पुन्हा तोंड फुटले. त्यानंतर संतप्त झालेल्या संशयितांनी धारदार शस्त्राने बाविस्कर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या कमरेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर वार झाल्याने ते जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने तातडीने जखमी बाविस्कर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्यामागील नेमके कारण, संशयितांची भूमिका आणि घटनेचे इतर तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. या घटनेमुळे खेडी गाव परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.



