पारोळा प्रतिनिधी | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मितीसह दुष्काळ निवारणाच्या कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या व्हीबी-जी रामजी योजनेची राज्यातील पहिली कार्यशाळा पारोळा शहरात पार पडली. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित या कार्यशाळेत योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नियोजन आणि विविध कामांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या योजनेअंतर्गत दुष्काळ निवारणाशी संबंधित एकूण ३७५ कामांचा समावेश असल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि रोजगाराच्या समस्यांवर मात करण्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
या कार्यशाळेला योजनेचे मिशन महासंचालक अतुल कोदे, रोजगार हमी योजनेचे मंत्रालयीन सहसचिव कैलास सोळुंके, कार्यासन अधिकारी भरतसिंग निकुंभ आणि रोजगार हमी योजनेचे उपसंचालक विजयकुमार कलवले उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना योजनेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले.
आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत दुष्काळ निवारणासाठी आवश्यक कामे प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा झाली. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात या योजनेच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामे करून हा मतदारसंघ दुष्काळ निवारणाच्या बाबतीत राज्यासाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेमुळे आगामी काळात दुष्काळ निवारणाच्या कामांना गती मिळण्याची आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



