जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलगाडी हस्तगत करण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असून, चोरीची बैलगाडी आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली टेम्पो गाडी असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव गोलाईत शिवारातील शेत गट क्रमांक १०७ मधून फिर्यादी यांच्या मालकीची दोन बैलांसह बैलगाडी चोरीला गेली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बैलगाडीची चोरी केल्याची माहिती समोर आली. पुढील तपासात चोरीची बैलगाडी सुनसगाव येथील पिंटू ऊर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे यांच्या शेतात मिळून आली. पोलिसांनी बैलगाडी मूळ मालकाच्या ताब्यात दिली असून, चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गोखरे यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.



