जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हिम्मतसिंग होते. लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांची जपणूक आणि मतदार यादीतील अनियमिततांबाबत जनजागृती करण्यासह काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
मतदानाचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, प्रत्येक नागरिकाचा हा अधिकार सुरक्षित राहणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. मतदार यादीतील संभाव्य अनियमिततांबाबत नागरिकांना माहिती देणे, मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती करणे आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली.
अभियान यशस्वी करण्यासाठी गावागावांत तसेच शहरातील विविध भागांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बूथ स्तरापासून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच जनतेच्या प्रश्नांशी जोडून राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस हारून नदवी, प्रदेश सचिव ऐश्वर्या राठोड, पश्चिम जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, जळगाव शहर काँग्रेस अध्यक्ष जमील शेख, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी आणि माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धनेश्वर कोळी, विशाल पवार, अनंत परिहार आणि राहुल भालेराव यांचाही सहभाग होता.
बैठकीच्या शेवटी ‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण, जनजागृती आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आगामी काळात सातत्याने जनसंपर्क मोहीम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



