जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय कंपनी कामगाराने कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आली. अरविंद शामराव पाटील असे मृत कामगाराचे नाव असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे पारोळा तालुक्यातील पडदे गावातील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून कामाला होते. ते जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामासाठी घरातून सुमारे सहा वाजता निघाले होते.
दरम्यान, कंपनीच्या बाहेर असलेल्या एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. सकाळी कंपनीत कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरविंद पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.



