जळगाव प्रतिनिधी | जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव येथील संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या शुभहस्ते योगशिक्षक व लेखक डॉ. कृणाल महाजन लिखित ‘पातञ्जल योगसूत्राणि – Transliteration and Simple Meaning’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन आज महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. भारतीय योगपरंपरा, महर्षी पतंजली यांचे तत्त्वज्ञान आणि योगसूत्रांचे महत्त्व वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
डॉ. कृणाल महाजन आणि डॉ.रेणुश्री बनसोड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १४ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने आयोजित ‘महायोगोत्सव २०२६, धुळे’ या योग संमेलनात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले. भारतीय ज्ञानपरंपरेतील योगशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकाच्या माध्यमातून महर्षी पतंजली यांनी प्रतिपादित केलेल्या योगतत्त्वज्ञानाचा इंग्रजी भाषेतील वाचकांना अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मुखपृष्ठ विमोचनप्रसंगी डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पुस्तकातील लेखन, योगसूत्रांचा आशय आणि त्यामागील तात्त्विक विचार यांविषयी डॉ. कृणाल महाजन यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. योगसूत्रांसारख्या गहन विषयाचा अभ्यास करून तो वाचकांसमोर सुसंगत पद्धतीने मांडण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच, त्यांच्या या शैक्षणिक व साहित्यिक कार्याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्रदान केला.
महर्षी पतंजली यांनी मांडलेले योगदर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. चित्तवृत्तींचे स्वरूप, मनाचे नियंत्रण, साधनेचे विविध टप्पे, अष्टांगयोग, ध्यान, समाधी आणि कैवल्य अशा विविध विषयांचा योगसूत्रांमध्ये सखोल विचार करण्यात आला आहे. या तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण परिचय करून देण्याच्या दृष्टीने ‘पातञ्जल योगसूत्राणि’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
डॉ. कृणाल महाजन हे योगशिक्षण, संशोधन आणि साहित्यलेखन या क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी हठप्रदीपिका, घेरण्ड संहिता, योगगीता आणि पातंजल योगसूत्र या पुस्तकांचे लेखन केले आहे. योगशास्त्रातील पारंपरिक ग्रंथांचा अभ्यास, त्यातील तत्त्वज्ञानाचे आकलन आणि ते आधुनिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून दिसून येतो. आता त्यांच्या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याने त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कार्यात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जोडला जात आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. संजय शेखावत, रजिस्ट्रार डॉ. अरुण पाटील, अभियांत्रिकी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडदकर, प्रा. वसीम पटेल, मानव संसाधन व्यवस्थापक श्री. मयूर गोपाले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विमोचन सोहळ्यामुळे डॉ. कृणाल महाजन यांच्या आगामी पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रवासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.



